पालोद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने प्रशासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पालोद (ता. सिल्लोड) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरफ मंगळवारी (दि. ५) यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचे औचित्य साधून पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तहसीलदार तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अंकिता ताकभाते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अंकिता ताकभाते यांच्या तहसीलदारांच्या हस्ते बारावीतील गुणवंतांचा  हस्ते सत्कार झाले. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार तुकाराम बनकर, महसूल अधिकारी आशिष औटी, मंडळ अधिकारी विशाल शेलकर, पंचायत समिती सदस्य किशोर जगताप, सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मच्छिंद्र पालोदकर, पोलीस पाटील कृष्णा पालोदकर, प्रतिष्ठित नागरिक आबा पाटील जंजाळ, ग्रामविकास अधिकारी जयदीप सुरुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शिबिरादरम्यान महसूल विभागाशी संबंधित विविध तांत्रिक व कायदेशीर कामांचा निपटारा करण्यात आला. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतुदीनुसार ७/१२ मधील दुरुस्त्या, प्रलंबित फेरफार नोंदी आणि वारस तपासणी यांसारख्या प्रकरणांवर तात्काळ सुनावणी घेण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) यांचे जागेवरच वितरण करून प्रशासनाने आपली सक्रियता दर्शवली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी स्पष्ट केले की, महाराजस्व समाधान शिबिराचा मुख्य उद्देश महसूल विभागाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. प्रलंबित प्रकरणांचे कायदेशीर कालमर्यादेत निराकरण व्हावे आणि सामान्य जनतेला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वयामुळे अनेक किचकट प्रश्न सुलभतेने सुटत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

कार्यक्रमाच्या विशेष सत्रात सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयाच्या बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा तहसीलदार ताकभाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रशासकीय कामासोबतच शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तलाठी अक्षय घाटेकर, मोहन राठोड, गणेश फरकाडे, मंडळ कृषी अधिकारी गणेश इंगळे, उपकृषी अधिकारी विनायक सपकाळ, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय सपकाळ, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच योगेश पालोदकर, अमोल बडक, गजानन कोरडे व नारायण म्हस्के यांसह महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.